Nepal Flood : नेपाळमधील महाप्रलयात 288 भारतीय बेपत्ता? 21 जणांची सुटका; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची अपडेट
Nepal Flood : नेपाळमधील भीषण पुरात 288 भारतीय नागरिकांशी संपर्क तुटला आहे. 21 जणांची सुटका झाली असून तिबेटमध्ये सुमारे 200 भारतीयांनी मदत मागितली आहे.

Nepal Flood : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान 270 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) भारतीय नागरिकांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नेपाळमध्ये 288 भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, तर 21 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय तिबेटमध्ये सुमारे 200 भारतीयांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संपर्क होऊ न शकलेल्या 288 भारतीयांमध्ये त्रिशुली-1 जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 जणांचा समावेश आहे.
तसेच अमरनाथ यात्रेसाठी सम्राट आणि फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास केलेल्या तामिळनाडूतील 37 आणि 49 नागरिकांच्या दोन गटांशी संपर्क झालेला नाही. सम्राट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून रसुवा जिल्ह्यात गेलेल्या पश्चिम बंगालमधील 32 नागरिकांचाही संपर्क तुटला आहे.
याशिवाय रिचा टूर्सच्या माध्यमातून प्रवास केलेल्या विविध राज्यांतील 61 भारतीय नागरिकांचा तसेच केरळमधील 33 नागरिकांचा समावेश बेपत्ता असलेल्या भारतीयांमध्ये आहे.
दरम्यान, बचाव आणि मदतकार्य सुरू असून आतापर्यंत 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तिबेटमध्ये अडकलेल्या किंवा तेथे असलेल्या सुमारे 200 भारतीयांनी मदतीसाठी संपर्क साधला असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
नेपाळमध्ये महापूर का आला? मोठ्या प्रमाणात नुकसान –
नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमालयीन भागात हिमनगाचा मोठा भाग कोसळल्याने त्यासोबत बर्फ, दगड आणि चिखल नदीत आला. त्यामुळे ल्हेंडे आणि भोटेकोशी नदीच्या प्रवाहात अचानक मोठी वाढ होऊन प्रचंड वेगाने फ्लॅश फ्लड आला. सुरुवातीला भूकंपामुळे पूर आल्याची शक्यता व्यक्त झाली होती; मात्र नंतरच्या विश्लेषणात हिमनग कोसळणे हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले.
या महापुराचा सर्वाधिक फटका रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांना बसला. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या चिखल-दगडांच्या प्रवाहाने घरे, बाजारपेठा, रस्ते आणि पूल वाहून गेले. अनेक वीज प्रकल्प व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. महत्त्वाचे रस्ते बंद झाल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून मृतांचा आकडा 270 पेक्षा अधिक झाला असून मोठ्या संख्येने नागरिक बेपत्ता आहेत.





