Nepal Flood : नेपाळमधून 21 भारतीय सुखरूप दिल्लीत दाखल; जयशंकरांनी घेतली भेट, अजून 315 जणांशी संपर्क नाही
Nepal Flood : नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या 21 भारतीयांची सुटका करून त्यांना दिल्लीत आणण्यात आले. एस. जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली. अजून सुमारे 315 भारतीयांशी संपर्क नाही.

Nepal Flood : नेपाळमध्ये आलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमधून 21 भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-3 येथे या नागरिकांची भेट घेत त्यांचे कठीण परिस्थितीतील अनुभव जाणून घेतले.
नेपाळी लष्कराने या भारतीय नागरिकांची कठीण परिस्थितीत सुटका करून त्यांना काठमांडू येथे पोहोचवले. त्यानंतर भारतीय दूतावासाने त्यांच्या भारतात परतण्याची व्यवस्था केली. जयशंकर यांनी सांगितले की, सर्वजण सुरक्षित असल्याचे पाहून मोठा दिलासा मिळाला. पूरानंतर हे नागरिक काठमांडूला पोहोचले होते आणि त्याच विमानाने त्यांना भारतात परत आणण्यात आले.
#WATCH | Nepal flash flood | Delhi: EAM Dr S Jaishankar says, “I just received a group of Indians who had gone on pilgrimage to Kailash Mansarovar. They had been rescued after the floods. So, they were brought back to Kathmandu. They were rescued by Nepali Army. Then our Embassy… pic.twitter.com/O12HsPFNJ8
— ANI (@ANI) August 28, 2026
अजून 315 भारतीयांशी संपर्क नाही –
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यावर सध्या भारताचा मुख्य भर आहे. सुमारे 315 भारतीयांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. ही संख्या परिस्थितीनुसार बदलत आहे. दरम्यान, विविध ठिकाणांहून सुमारे 85 भारतीयांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, दिल्लीत पोहोचलेले 21 नागरिक त्यापैकीच आहेत.
जयशंकर यांनी सांगितले की, या नागरिकांनी पूर कसा आला आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याची माहिती दिली. अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य करणाऱ्या नेपाळी लष्कराचे त्यांनी विशेष आभार मानले.
नेपाळला सर्वतोपरी मदतीची तयारी –
जयशंकर यांनी शुक्रवारी सकाळी नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केली. भारताने नेपाळला विविध प्रकारची मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. नेपाळकडून या मदतीच्या प्रस्तावांचे मूल्यांकन सुरू असून, गरजेनुसार योग्य ती मदत स्वीकारली जाणार आहे.
सध्या भारताचे प्राधान्य नेपाळमधील बचाव आणि मदतकार्याला सहकार्य करणे तसेच तेथे असलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क प्रस्थापित करणे हे आहे.






