खातेवाटपाचा पेच सुटेना अन पालकमंत्रीही ठरेना

नगर – महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीवाटप प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झाले असले तरी खातेवाटप मात्र अजून रेंगाळले आहे. खातेवाटप पण नाही व पालकमंत्री पण नाही अशी अवस्था झाली आहे. बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे या तिघांपैकी कुणाला पालकमंत्रीपदाची संधी मिळणार की जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला संधी दिली जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी तयार झाली.
पहिल्या टप्प्यात अवघ्या आठ-दहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात नगरचे बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता. त्यांच्याकडे महसूलसह महत्वाची खाती आली. परत महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यात क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना शिवसेनेने आपल्या कोट्यातून कॅबिनेटपद दिले. तर राष्ट्रवादीने राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रीपद दिले. मात्र आता या सर्वांना कोणते खाते मिळणार हे अजून नक्की नाही.
तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री कोण यावरही चर्चा होत आहे. या तिघांपैकी कुणाला संधी दिली जाणार की बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्याला संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे कारण त्यामाध्यमातून त्यांना जिल्ह्यावरील आपली पकड मजबूत करायची आहे. तनपुरे यांना संधी दिली नाही तरी दिलीप वळसे वा जयंत पाटील यांना संधी दिली जावू शकते. या दोघांना नगर जिल्ह्याची चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. तसेच बाळासाहेब थोरात यांचेही नाव चर्चेत आहे.





