नवी दिल्ली – सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणली होती. ती बंदी पंडीत नेहरू यांच्यामुळे उठवण्यात आली होती. जर सरदार पटेल हे आणखी दहा वर्षे जगले असते तर तुम्हाला त्यांनी कधीच उखडून फेकले असते. आज तुम्ही येथे दिसला ही नसता, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी राज्यसभेत केला. तुम्हाला कुलभूषण जाधवला पाकिस्तानातून आणता आले नाही. ते गेले कित्येक वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत पडले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला. ऑपरेशन सिंदूरवर लोकसभे प्रमाणे राज्यसभेतही चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपला आरसा दाखवला. पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26 जणांची हत्या झाली. हे सरकार अजूनही सांगू शकले नाही. संपूर्ण काश्मीर गृहमंत्र्यांच्या हातात आहे. काश्मीरमध्ये आर्म फोर्स आहे. तिथे उपराज्यपाल आहेत. ते ही मजबूत आहेत. तरीही पहलगामध्ये हल्ला झाला. त्यानंतर त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणतात सुरक्षेत चूक झाली आहे. पण 26 लोक मारले गेले. चूक तर नक्कीच झाली आहे. सिंदूर उजडलं आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? राजीनामा कोण देणार? असा थेट सवाल राऊत यांनी राज्यसभेत सरकारला केला. जर राजीनामा कुणी द्यायला पाहीजे तर तो गृहमंत्र्यांनी दिला पाहीजे असं ते म्हणाले. जर 24 तासात उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो. कारण ते तुमचं ऐकत नाहीत. तर मग 26 जणांचा जीव जातो. त्याची जबाबदारी घेवून राजीनामा दिला जात नाही. देशाची माफी मागितली जात नाही अशी विचारणी ही राऊत यांनी केली.