लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने भोजपुरी गायिका आणि युट्यूबर नेहा सिंग राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. एप्रिलमध्ये नेहा सिंग राठोड यांनी केलेल्या वक्तव्यावरून या वर्षाच्या सुरुवातीला लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या आरोपांसाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात गायिकेविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कवी अभय प्रताप सिंह यांनी ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असा दावा करण्यात आला होता की, नेहाची पोस्ट जाती-आधारित द्वेष आणि देशविरोधी भावना पसरवू शकते. हा खटला एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत राठोड यांच्या टिप्पण्यांशी संबंधित आहे. बिहार में का बा या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा सिंग राठोड यांनी २३ एप्रिल रोजी आपल्या पोस्टमध्ये आरोप केला की, केंद्र सरकार जात आणि धर्माच्या आधारे राजकारण करत आहे. पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून राठेड यांनी अनेक पोस्ट केल्या होत्या. नेहा सिंग राठोड यांनी त्यांच्या विधानांचे समर्थन केले आणि आग्रह धरला की, त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. माझा हेतू हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेबद्दल पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचा होता. ते विधान गाणे म्हणून नव्हते, तर पर्यटकांच्या सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासाठी थेट आवाहन होते. त्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मी पंतप्रधानांना त्या ठिकाणी पहलगामच्या पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल विचारले होते. त्यामुळे माझ्याविरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या.