मस्क व ट्विटर दरम्यान वाटाघाटी ; एक मे पूर्वी मस्क ट्विटर खरेदी करणार

सॅन फ्रान्सिस्का – ट्विटर या समाज माध्यम कंपनीने सुरुवातीला ट्विटरची टेस्ला प्रमुख ऍलन मस्क यांना विक्री करण्यास कडवा विरोध केला होता . मात्र मस्क यांनी ट्विटर मधील इतर गुंतवणूकदारांच्या मदतीने व्यवस्थापनावर दबाव आणल्यानंतर आता ट्विटरचे व्यवस्थापन आणि मस्क दरम्यान वाटाघाटी चालू आहेत.
ऍलन मस्क लवकरच म्हणजे एक मे पूर्वी ट्विटर कंपनी खरेदी करण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. मस्क यांच्याकडे ट्विटरचे तब्बल नऊ टक्के भागभांडवल आहे. उरलेले भाग भांडवल 43 अब्ज डॉलरला विकत घेण्याची तयारी मस्क यांनी केली आहे.
त्यासाठी त्यांनी 47 अब्ज डॉलरची उभारणी केली असल्याचे बोलले जाते. मस्क यांनी 14 एप्रिल रोजी अमेरिकेतील शेअर बाजार नियंत्रकांना यासंदर्भात तपशिलात माहिती दिली आहे. सध्याच्या अवस्थेतच ट्वीटर कंपनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करू शकत नाही. आपण ही कंपनी खरेदी केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत कसलीही तडजोड करणार नाही. त्याचबरोबर कंपनीचे बाजार मुल्य वेगात वाढण्यासाठी प्रयत्न करू असे मस्क यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्विटर कंपनीने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आपण आपल्याकडील सर्व नऊ टक्के भाग भांडवल विकून टाकू असा इशारा मस्क यांनी दिला आहे.





