पुणे | आरोग्य योजनेत निष्काळजी; पुणे मनपाला नोटीस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पंतप्रधान आरोग्य विमा योजना आणि राज्य सरकारची महत्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही यांचे एकत्रीकरण करून एक जुलैपासून राज्यात आयुष्यमान भारत योजना राबविण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी आयुष्यमान भारत मिशन योजनेचे राज्याचे प्रमुख डाॅ. ओमप्रकाश शेट्ये बैठक बोलवली होती.
या बैठकीला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या योजनेचे लाभार्थींची संख्या वाढविण्यात महापालिकेचे काम समाधानकारक नसल्याबाबतही नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य खाते, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि शहरातील रुग्णालयांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
परंतु या बैठकीला दोन्ही महापालिकांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. तसेच या प्रकरणी दोन्ही महापालिकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचना डॉ. शेट्ये यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही नोटीस बजाविण्यात येणार आहे.
डॉ.शेट्ये यांनी सांगितले, “पुणे शहर व परिसरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या जवळपास ६३ लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ १३ लाख जणांची नोंद झाली आहे.
त्यामध्ये पुणे महापालिकेचे काम असमाधानकारक असल्याचे दिसून आले. वास्तविक महापालिकेकडे आरोग्यासंदर्भात चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. असे असतानाही त्यांच्याकडून नोंदणी कमी झाली आहे. तसेच बैठकीला आमंत्रित करून देखील त्यांचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही.’


