कोपर्डे हवेली -ओगलेवाडी, ता. कराड येथील रेल्वे कर्मचारी करोनाबाधित झाल्याचे समोर आल्याने रेल्वे कर्मचारी व संपर्कातील स्थानिक हादरले आहेत. परंतु, संशयितांच्या करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आल्याने सर्वांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. असे असले तरी वर्दळीच्या शिरवडे रेल्वे स्टेशन व नडशी कॉलनी परिसरातील वातावरण तणावग्रस्त आहे.
प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ओगलेवाडीतील बाधित रूग्णाची नोकरीच्या ठिकाणची वर्दळ वगळता संशयिताने वैयक्तिक बंधने पाळल्याने त्यांच्यावरील संकट अंतरावर राहिले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने सूचना देऊन होम क्वारंटाइन केले आहे.
मसूर आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश लोखंडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह नडशी कॉलनी व शिरवडे स्टेशन परिसरात ध्वनीक्षेपकावरून करोना विषयी प्रबोधन करून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जि. प. सदस्य निवासराव थोरात, नडशी सरपंच गोविंदराव थोरात यांनी उपाययोजनांचे नियोजन केले. प्रतिबंधक औषध फवारणी व अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक महादेव जाधव व तलाठी सुजित थोरात सक्रिय आहेत. सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन केले जात आहे.
शिरवडे विभागात मानुसकीचे दर्शन
करोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच गोविंदराव थोरात, उपसरपंच बळवंत नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर थोरात यांनी स्वखर्चाने पाचशे मास्कचे वाटप केले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रताप शिंदे, हणमंत घाडगे यांनी गावात सोडियम हायपोक्लाराईडची दुबार फवारणी केली. इतर व्यक्तींचा संपर्क टाळण्यासाठी होम क्वारंटाइन कुटुंबास जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची सोय दैनिक प्रभातचे प्रतिनिधी मोहसीन संदे यांनी केली आहे.