NEET PG 2026 – राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून पदव्युत्तर दंत (एमडीएस) व वैद्यकीय (पीजी) अभ्यासक्रमांसाठीच्या नीट परीक्षांच्या संभाव्य तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट-एमडीएस परीक्षा २ मे रोजी, तर नीट-पीजी परीक्षा ३० ऑगस्टला घेतली जाणार आहे. देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखांसोबतच मंडळाने पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या आंतरवासिता (इंटर्नशिप) पूर्ण करण्याची मुदतही स्पष्ट केली आहे. नीट-एमडीएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत आपली इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक आहे, तर नीट-पीजी परीक्षेसाठी ३० सप्टेंबरला ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. दरम्यान, परीक्षा संदर्भात सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. या पार्श्वभूमीवर, उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या तारखा या संभाव्य असून, यामध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत माहिती पुस्तिका आणि अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी सातत्याने मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.