NEET paper leak : नीट (NEET) परीक्षेचा फुटलेला पेपर देशातील तब्बल ५ राज्यांमध्ये विकला गेला असून या पेपरची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आहे, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉप यांसारख्या डिजिटल गॅजेट्सच्या तांत्रिक तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. ( NEET paper leak) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटीच्या सिंडिकेटला सर्वाधिक आर्थिक प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळाला असून महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. ज्या पालकांनी आणि मध्यस्थांनी हा पेपर कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केला त्यांनी तो पुढे इतर विद्यार्थ्यांनाही विकल्याचे समोर येत आहे. (NEET paper leak) पेपरफुटीची व्याप्ती वाढताना आता आणखी बडे मासे गळाला लागत असून लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडून डॉ. शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी लीक झालेली प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय आहे. (NEET paper leak) सीबीआयने त्याला लातूरहून पुण्यात आणून त्याची कसून चौकशी केली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातही सीबीआयने मोठी कारवाई करत एका बहीण-भावाची कसून चौकशी केली असून, त्यांच्याकडून मोबाईल, सीम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आई शिक्षिका असून, त्यांचीही या प्रकरणात चौकशी सुरू आहे. या आंतरराज्यीय रॅकेटचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआय आता कठोर पावले उचलत आहे. या प्रकरणात नाशिकमधून सर्वात आधी अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार, पुण्यातील बॉटनी शिक्षिका प्रा. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या तिघांना समोरासमोर बसवून सीबीआय चौकशी करणार आहे. यामुळे हा पेपर नक्की कुठून आणि कोणाकोणाच्या माध्यमातून वितरित झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.