NEET JEE Free Coaching: साथी पोर्टलवर मोफत कोचिंगसाठी नोंदणी सुरू, लाखो रुपये वाचवा!

NEET JEE Free Coaching: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 11वी आणि 12वी मधील विद्यार्थ्यांना JEE आणि NEET सारख्या कठीण प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘साथी प्लॅटफॉर्म’ उपक्रमांतर्गत या परीक्षांसाठी मोफत कोचिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. 25 एप्रिलपासून नवीन बॅच सुरू होत असून, नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
‘साथी प्लॅटफॉर्म’ म्हणजे काय?
‘साथी’ म्हणजेच Self Assessment Test and Help for Entrance Exams हा शिक्षण मंत्रालयाने JEE आणि NEET सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विकसित केलेला एक सरकारी डिजिटल व्यासपीठ आहे. याची अधिकृत वेबसाइट sathee.prutor.ai आहे. येथे विद्यार्थ्यांना आयआयटी आणि एम्सच्या वरिष्ठ प्राध्यापक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली अभ्यासाची संधी मिळते. या व्यासपीठावर लाइव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, सराव चाचण्या आणि अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध आहे.
आतापर्यंत 11 लाखांहून अधिक विद्यार्थी जोडले:
मीडिया रिपोर्टनुसार, 2023 पासून आतापर्यंत साथी पोर्टलशी 11.11 लाखांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. यापैकी अनेकांनी NEET आणि JEE सारख्या कठीण परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत. 2025 च्या JEE Main परीक्षेत 99 पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी साथी प्लॅटफॉर्मवरून कोचिंग घेतलं होतं.
11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:
या योजनेचा सर्वाधिक फायदा 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. सध्या 11वीत असलेले विद्यार्थी JEE आणि NEET 2026 व 2027 साठी तयारी करू शकतात, तर 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2025 आणि 2026 साठी नोंदणी करू शकतात. अशा प्रकारे, संसाधनांच्या अभावामुळे कोचिंग घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ वरदान ठरू शकतो.
नोंदणी कशी कराल?
साथी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत वेबसाइट sathee.prutor.ai वर जाऊन विद्यार्थी सहजपणे फॉर्म भरू शकतात. 25 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बॅचमध्ये सामील होऊन ते आगामी NEET आणि JEE प्रवेश परीक्षांची तयारी सुरू करू शकतात.





