पुणे, वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही 12 सप्टेंबरला होत आहे. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेसाठी हॉलतिकीटही उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्रासोबतच त्याचे प्रिंटही उमेदवारांना काढावे लागत आहे. तथापि, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. याच दिवशी अन्य महत्त्वाची परीक्षा असल्याचे याचिकेत म्हटले होते.
मात्र, ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, प्रवेशपत्रातील एक अपडेट उशिरा जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. सायबर कॅफेमधून प्रवेशपत्राची प्रिंट घेतल्यानंतर नीट प्रवेशपत्रात थोडा बदल करत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडण्यासाठी नवीन प्रवेशपत्र जाहीर केले गेले. यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रिंट पुन्हा काढावी लागत आहे.
सीईटी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीच्या तारखा नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर ही सीईटी देण्यासाठी ऍडमिड कार्ड (प्रवेशपत्र) राज्य सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. एमबीए, एम.पी.एड., बी.ए. आणि बी.एसस्सी.-बी.एड., एम.सी.ए., मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी हॉल तिकीटची लिंक खुली करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सीईटी देण्यासाठी हे प्रवेशपत्र आवश्यक असेल.