लातूर; नीट पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून सोडलेला एक जण फरार ; एक ताब्यात, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

NEET Exam Paper Leak Case । देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलंय. त्यानंतर नांदेडच्या एटीएस टीमने लातुरातून दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, त्यानंतर काही तासांनी लातूर पोलिसांनी तपास सुरू केला. यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, संजय जाधव हे शिक्षक फरार झाले आहेत. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.
एका शिक्षक फरार ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल NEET Exam Paper Leak Case ।
नांदेड एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिलेले शिक्षक संजय जाधव फरार झाले आहेत. त्या शिक्षकाच्या तपासासाठी आता पोलीस पथक रवाना झालंय. मात्र, काल संध्याकाळपासून संजय जाधव यांचा छडा लावण्यात पोलिस अपयशी ठरले. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असून ते फरार आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. पठाण नावाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला काल लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लातूर पोलिसांकडून तपासाला वेग NEET Exam Paper Leak Case ।
नीट पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शनमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शनिवारी सकाळपासून नीट पेपर फुटी प्रकरणी विविध घटना घडामोडी घडत होत्या. मात्र पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर येत नाही. यामुळे संभ्रम वाढत चालला आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेगवान हालचाली झाल्या आहेत. शनिवारी एटीएसनं चौकशी करून सोडून दिलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शहर पोलीस उपाधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसमोर पठाण यांची चौकशी करण्यात आली.
रात्री बारानंतर पोलिसांनी तपासासाठी विविध पथकं तयार केल्याची माहिती आहे. याबाबत कोणतेही अपडेट देण्यास पोलीस तयार नाहीत. मात्र, पेपरफुटी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपासून आतापर्यंत यात किती लोकांची चौकशी झाली? किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? याबाबत स्पष्टता नाही. मात्र जाधव आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याव्यतिरिक्त आणखी इतर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





