अहमदाबाद – महात्मा गांधींची पणती नीलमबेन पारिख यांनी गुजरातमधील नवसारी येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ९२ होते. महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील मतभेदांवर नीलमबेन पारिख यांनी एक पुस्तक लिहिले होते. यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. दक्षिणपथ आदिवासी महिलांच्या उद्धारासाठी नीलमबेन यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या आदिवासी महिलांना स्वावलंबन शिकवणे, शिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम नीलमबेन यांनी केले. हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच मुले होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. नीलमबेन या त्यांच्या खादीवरील निष्ठेसाठीही ओळखल्या जात होत्या. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले, अशी माहिती नीलमबेन यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी दिली. समीर पारिख यांनी सांगितले की, माझ्या आईला (नीलमबेन) कुठलाही आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे त्यांनी जेवण जवळपास सोडले होते. त्यांना ऑस्टिओपोरोसिस होता. त्यामुळे तिची हाडे ठिसूळ झाली होती. या एका कारणासाठी मी रुग्णालयात तिला न नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मी तिच्याजवळ बसून होतो. तिच्या नाडीचे ठोके हळूहळू मंदावले, त्यानंतर हळूहळू कुठलीही वेदना किंवा त्रास न होता तिने प्राण सोडले, अशी माहिती समीर पारेख यांनी दिली.