Neelam Gorhe : पुण्यात ५२९ ऐतिहासिक झाडांची कत्तल थांबणार? डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मनपा आयुक्तांना पत्र
Neelam Gorhe : महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमानुसार प्राप्त झालेल्या ७ हजार हरकतींवर नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून सुनावणी घेण्याची मागणी.

Neelam Gorhe – गणेशखिंड रस्त्याच्या रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी प्रस्तावित ५२९ ऐतिहासिक व जुन्या वृक्षांच्या तोडीला आता तीव्र विरोध सुरू झाला असून, या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून त्यांनी नियोजित वृक्षतोड तातडीने थांबवून वृक्ष संवर्धन करण्याची मागणी केली आहे.
महापालिका प्रशासनाने १ मार्च २०२६ रोजी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी सुमारे ७ हजार हरकती नोंदवल्या आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की,
महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या हरकतींवर संबंधित नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून सुनावणी घेणे आवश्यक आहे. तसेच, मेट्रो लाईन-३च्या पिलर्समुळे काही ठिकाणी रस्त्याची रुंदी आधीच मर्यादित झाली असल्याने केवळ वृक्षतोड करून वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी पर्यावरण विषयक संस्थांनी सुचविलेल्या पर्यायी आराखड्याचाही विचार करण्याची मागणी केली आहे. उपलब्ध जागेतच सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि वाहतूक नियोजन करून विकासकामे करता येऊ शकतात व त्यासाठी वृक्षतोड टाळता येणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती देऊन पुढील आठ दिवसांत महापालिकेचे नगर अभियंता, वाहतूक पोलीस, ‘परिसर’ संस्था आणि मॉडेल कॉलनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. या बैठकीत पर्यावरणपूरक डिझाईनची प्रत्यक्ष जागेवर पडताळणी करून पुढील निर्णय घ्यावा, असे त्यांनी सुचविले आहे.





