Neelam Gorhe : दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली. मुलाखतीवेळी नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नेमके काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत बोलताना केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केला. संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्या 4 वेळा आमदार, त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्या का? – राऊत एक महिला म्हणून नीलम गोऱ्हेंबद्दल आदर आहे. राजकारण त्यांनी त्यांचे चांगभलं केलेले आहे. ही सगळी गये गुजरे लोक आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केले. आमच्याकडे महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्यात का? दिल्या असेल तर त्यांनी पावत्या घेऊन याव्यात, असे आव्हान संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना दिले. असा आरोप करणे गोऱ्हेंची नमकहरामी – अंबादास दानवे दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या आरोपाचा ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. असा आरोप करणे म्हणजे नीलम गोऱ्हे यांची नमकहरामी आहे, असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. आयत्या बिळात बसून नीलम गोऱ्हे यांनी पद मिळवली- विनायक राऊत विनायक राऊत म्हणाले,नीलम गोऱ्हे यांना सगळ्यात जास्त पद शिवसेनेने दिली. आयत्या बिळात बसून नीलम गोऱ्हे यांनी पद मिळवली. जुन्या जाणत्या महिलांना डावलून 4 टर्म आमदार झाल्या. माझे आव्हान आहे त्यांना, त्यांनी शपथ घेऊन सांगावे की तुम्ही किती मर्सिडीज बेंझ गाड्या दिल्या? लाचारी पत्कारून कोणाला तरी सुखावण्यासाठी आरोप करायचे, अशा राजकारण्यांचा धिक्कार करतो, असे म्हणत विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, अमित शाह यांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल त्यांच्या पक्षाबद्दल शिवसेनेबद्दल जो द्वेष आहे तो वारंवार या निमित्ताने बाहेर पडत आहे, मुंबई गुजरातला जोडण्याचं काम या गद्दाराच्या साथीने कपट कारस्थानाने सध्या सुरू आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही काम करतोय, जनतेलाही हे माहीत आहे, प्रत्येक भाषणात तुम्हाला ऊद्धव ठाकरेंचा विषय का काढावा लागतो याचे त्यांनी उत्तर द्यावे. ठाण्यात भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालत आहे, एकमेकांच्या ऊरावर बसत आहेत, यादवी युद्ध सुरू झाले आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्याचे काम सुरू आहे, ठेकेदारांना पैसे देत नाहीत, लाडकी बहीण योजनेत 60 लाख बहिणी अपात्र होणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही योजना बंद होईल असे वाटत आहे, अशी टीकाही यावेळी विनायक राऊत यांनी सरकारवर केली आहे. नाव गोऱ्हे असले तरी काम काळे – किशोरी पेडणेकर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? या बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावले? कोणाची सुपारी घेतली?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ती माझी सहकारी कधीच नव्हती. नाव गोऱ्हे असले तरी काम काळे आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. या बाईने किती मर्सिडीज दिल्या? स्वतःला हुशार समजणारी ही बाई काय वेळ न बघता बरळल्याचा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला. पेडणेकर पुढे म्हणाल्या की तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावे. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेला तर साहित्यिकांच्या कार्यक्रमाला गेला. समाजाला दिशा देणारी माणसे म्हणजे साहित्यिक असतात. मात्र, बाई जाऊन बरळल्याचे पेडणेकर म्हणाल्या. या नालायक बाईला काय म्हणायचे आहे, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला. एक नंबरची ही खोटारडी बाई पुढे बोलताना किशोरी म्हणाल्या, मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि सतत बोलायची थांबावे लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केले नाही. पेडणेकर म्हणाल्या की मी एका कार्यक्रमासाठी बोलावले तर माझ्याकडे साडी मागितली. मी दिली तर मला ती परत केली. मला ही साडी पाहिजे, अशी साडी पाहिजे असे सगळे होते. बाळासाहेब साहित्यिकांना मान द्यायचे, तीच धुरा उद्धव साहेबांनी वाढवण्याचे काम केल्याचे पेडणेकर म्हणाल्या. सुषमा अंधारे काय म्हणाल्या? नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपावरती बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, दोन मर्सिडीज? अरे बापरे मला असं वाटतंय की नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षात खूप काळ राहिलेले आहेत. मला आत्ता काय दोन अडीच वर्षे झाली आहेत. जवळपास 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढली आहेत आणि जर त्या म्हणत आहेत. त्यात जर तथ्य असेल तर मला प्रश्न पडला आहे, की नीलम गोऱ्हे यांनी किती कमावलं असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकू द्यायच्या नाहीत. तीस वर्ष त्याच मातोश्रीवर असल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सर्व नेमणुकांचे अधिकार हे नीलम गोऱ्हे यांची सही किंवा नीलम गोरे यांनी सांगितल्यावरच ते सामनामध्ये जायचं. तर निश्चितपणे ही सगळी कामाई नीलम गोऱ्हे यांच्याकडे जात असेल त्यांना याबाबत विचारलं पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र – काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर राजकारणासाठी साहिते संमेलन मंचांचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नहार यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले? दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.