नवी दिल्ली – भारत आणि रशिया दरम्यानचा व्यापार 70 अब्ज डॉलरचा आहे. मात्र रशियाकडून भारत जास्त आयात करतो तर कमी निर्यात करतो. रशियाला निर्यात वाढविण्याच्या संधीचा उपयोग करण्याची गरज असल्याचे मत उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. सध्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन भारत भेटीवर आहेत. यावेळी या विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की सध्या भारत रशियाला केवळ 4.9 अब्ज डॉलरची निर्यात वर्षाला करीत आहे. तर रशियाकडून होणारी आयात 63.8 अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट 59 अब्ज डॉलर आहे. रशियाकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात केले जात असल्यामुळे रशियाकडून भारताला होणारी आयात जास्त आहे. दोन्ही देशानी 2030 पर्यंत उभय देशातील व्यापार 100 अब्ज डॉलर पर्यंत वाढविण्याचा संकल्प केला आहे. दोन्ही देशातील मैत्री पाहता हे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. गोयल यांनी सांगितले की, रशियाला भारत ग्राहक वस्तू, अन्नपदार्थ, वाहन, ट्रॅक्टर, व्यवसायिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्टफोन, औद्योगिक उपकरणांची निर्यात करू शकतो. त्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्रालयादरम्यान केल्या जात आहेत. भारतातील सेवा क्षेत्रातूनही रशियाला मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या रशियाच्या अधिकार्यांनी सांगितले की, रशिया जेवढी आयात करतो त्यातील केवळ दोन टक्के आयात भारतातून होते. भारत- रशिया मैत्री पाहता आयात वाढविण्यासाठी आम्ही भारताला आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी बांधील आहोत. दोन्ही देशादरम्यानचा व्यापार संतुलित राहिला तर तो दीर्घकाळात वाढू शकेल असे त्यांनी सांगितले. या अधिकार्यांनी सांगितले की भारत कृषी उत्पादने, औषधी, दूरसंचार उपकरणे, औद्योगिक उपकरणे आणि कुशल मनुष्यबळ या क्षेत्रात रशियाला मदत करू शकतो.