विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज – डॉ. पराग काळकर

पुणे – शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व प्रज्ञा वार्षिक अंकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे, प्रज्ञाचे संपादक प्रा. कैलास शिंदे, मुख्याध्यापक सुनिल शिंदे आदींसह अन्य प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण, वाचन व चिंतनाची सवय लावायला पाहिजे. प्रत्येकाच्या विचारात परिवर्तन घडविण्याची क्षमता असते. देशाला घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे कार्य महत्वाचे ठरणार आहे, असेही डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आत्मसात करुन ते आचरणात आणल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी मिळेल, असे मत डॉ. डी. जी. देशकर यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रेयसी परब यांनी केले. आभार प्रा. कैलास शिंदे यांनी मानले.





