नवी दिल्ली – भारताचा कृषी क्षेत्राचा विकासदर समाधानकारक पातळीवर आहे. आणखी तो वाढण्याची गरज आहे. शेतकर्यांना बनावट बियाणे आणि खते मिळतात हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. शेतकर्यांना त्यांच्या कृषी उत्पादनासाठी निश्चित आणि एकच भाव मिळत नाही. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय शेतकर्यांनी उत्पादन मूल्य जास्त असूनही गेल्या काही वर्षांत विक्रमी धान्य उत्पादन केले आहे. शेतकर्यांना त्यांच्या मालाला भाव मिळण्याची गरज आहे. त्यासाठी निर्यातीचा योग्य प्रमाणे वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकर्यांना त्यांच्या उत्पादन मूल्यापेक्षा जास्त भाव मिळावा, त्याचबरोबर ग्राहकांनाही योग्य भावात कृषी उत्पादने उपलब्ध व्हावी. यामध्ये संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. या दृष्टिकोनातून सर्व संबंधितांची 22 व 23 डिसेंबर रोजी हरियाणात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.