Narayangaon : द्राक्ष, मनुके व सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंधांची गरज
Narayangaon : या पार्श्वभूमीवर अशा उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली तयार करून तिची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी मेहेर यांनी केली.

नारायणगाव : भारतात बेकायदेशीर मार्गाने आयात होणार्या द्राक्ष, मनुके तसेच इतर सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंध घालून प्रभावी नियमावली तयार करावी, अशी मागणी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या सल्लागार समितीचे सदस्य कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केली. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या 51व्या बैठकीत ते बोलत होते.
परदेशातून बेकायदेशीर मार्गाने भारतात येणार्या मनुके आणि इतर सुकविलेल्या फळांमध्ये विविध रासायनिक अवशेष आढळण्याची शक्यता आहे. अशा उत्पादनांची बाजारपेठेत विक्री होत असल्यास ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर बेकायदेशीर आयातीमुळे देशांतर्गत मनुका उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मेहेर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर अशा उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली तयार करून तिची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी मेहेर यांनी केली. यावर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे अध्यक्ष रणजित पुनहोनी यांनी अशा उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्याचा विषय अजेंड्यावर घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
द्राक्ष, मनुके आणि इतर सुकविलेल्या फळांच्या बेकायदेशीर आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना झाल्यास देशातील द्राक्ष व मनुका उत्पादकांना देशांतर्गत बाजारपेठेत अधिक योग्य संधी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. द्राक्ष व मनुका उत्पादकांचे हित, अन्नपदार्थांची सुरक्षितता तसेच दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळवून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ डॉ. राहुल घाडगे उपस्थित होते.
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवरही चर्चा
कृषिरत्न अनिल मेहेर यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, निर्धारित मानके आणि सुरक्षितता याबाबत चर्चा केली. दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा तसेच गुणवत्तेच्या निकषांनुसार त्यांना न्याय मिळावा, यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.





