Pimpri : कर्ज पाहिजे रस्त्यांवरील खड्डे बुजवायला

पिंपरी : महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्पांसाठी शेकडो कोटीचे कर्ज काढण्यात येत आहे. मात्र, शहरातील मुख्य रस्ते व उपगरांमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये आता एका तरुणाने हातात फलक घेवून ‘कर्ज हवंय, मात्र ते रस्त्यावरील खड्डे बुजवायला,’ अशी टॅगलाइन करुन खड्ड्याचे धक्कादायक वास्तव दाखवण्यासाठी चौका-चौकात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे विविध पुरस्कार घेत गतीमान व राहण्यायोग्य शहराचा टेंभा मिरवणार्या पिंपरी महापालिकका प्रशासनाचे वाभाडे निघत आहेत.
भोसरीतील एका कामगाराने चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवंय, असा पिंपरी चिंचवड महापालिकेला उपरोधिक टोला मारत खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली. याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली, आकुर्डी, परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच शहरातील भोसरी एमआयडीसी, चिखली, जाधववाडी, चिंचवड, निगडीसह काही भागातील रस्त्यावर खड्डे आहेत. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी वाहतूक संथ होऊन कोंडी होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर कामगार ऋषिकेश पाचणकर यांनी चक्क चौकात उभे राहून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे असल्याचा फलक अंगावर घालून महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. पाचणकर हे कामाला जाण्यापूर्वी आणि कामावरून घरी जाताना चौका-चौकात थांबून खड्डे बुजविण्यासाठी अनोख्या पद्धतीने महापालिकेकडे पाठपुरावा करताना दिसतात. गेल्या दोन महिन्यांपासून ते पुणे, भोसरी, चाकण, चऱ्होली आदी भागांतील रस्त्यावर थांबून जनजागृती करत आहेत. खड्ड्यांची दुरुस्ती तुम्ही तात्पुरती करता मग आम्ही कर कायमस्वरूपी का भरायचा? असा सवालही ते फलकाद्वारे करत आहेत.
शहरातील नागरिक महापालिकेकडे कर भरतात, असे असूनही नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात ही होतात. महापालिका खड्ड्यांची डागडुजी करते परंतु ते ही निकृष्ट पद्धतीने. यामुळे रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशाचा हा अपव्यय होत आहे. महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तात्पुरती डागडुजी न करता ते कायमस्वरुपी भरण्यासाठी मी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत आहे.
– ऋषीकेश पाचणकर, कामगार, भोसरी





