अरुण गोखले संताच्या वचनाचा अर्थ हा संत सद्गुरू पदास पोहोचलेल्यांनाच विचारावा लागतो. तरच तो नेमकेपणाने कळतो. संतश्रेष्ठ तुकोबारायांचा एक जागृतीपर अभंग आहे. त्यात ते एके ठिकाणी असे म्हणतात की- गुरू वचने फुटली पहाट… आता ही गुरू वचने फुटली पहाट म्हणजे काय? एका सत्संगात नेमकेपणाने या वचनाचा अर्थ काय? असे विचारले असता सद्गुरू ज्ञाननाथजी म्हणाले, “बाबांनो! तुमचा हा प्रश्न फारच छान आहे. ही जिज्ञासा प्रशंसनीय आहे. आता असं पाहा की, प्रथम आपल्याला पहाट म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे. तर पहाट म्हणजे अज्ञान रूपी अंधाऱ्या रात्रीचा शेवट आणि ज्ञानरूपी सूर्योदयाची जी मंगल वेळा ती म्हणजे पहाट. खरं तर निसर्गात ही अशी नवीपहाट रोज फुटत असते. ही निसर्गातील पहाट जशी रात्रीचा अंधार दूर करते आणि प्रकाशाचे सारे साम्राज्य निर्माण करते. त्या प्रमाणे सद्गुरूच्या बोधाचा सूर्योदय माणसाच्या जीवनात झाला की, त्याच्या जीवनातील मी, माझे, मला हा स्वार्थ, माया, मोह, ममता आसक्ती यात वैचारिक परिवर्तन घडते. त्यातून ज्ञानाचा उदय होतो. जीव हा खऱ्या अर्थाने जागणे ही त्याच्या जीवनातली गुरूकृपेने फुटणारी पहाट आहे. हल्ली शहरी जीवनात फारशी पाहायला मिळत नाही. पूर्वी खेडोपाड्यातून मात्र अशी खरी पहाट जागवीत काही मंडळी हे दारोदार यायची, खेड्यात अजूनही येतात. त्यात गाव जागवीत येणारी वासुदेवाची स्वारी, रामदासे मंडळी ही जशी तसेच “उठा उठा हो सकलिक वाचे स्मरावा गजमुख’ किंवा “घनश्याम सुंदरा श्री धरा अरुणोदय झाला’ असे भूपाळीचे स्वर कानी यायचे आणि त्या बरोबर मानवी तना-मनासही जागविले जायचे. पहाटेचं शांत प्रसन्न सुगंधित शीतल वातावरण, पक्ष्यांच मधुर कुंजन, भूपाळीचे दूर वरून येणारे सूर, मंदिरातल्या घंटांचे आवाज अशी पहाट फुटत यायची. ती पहाट मानवी मनास जागवायची. ते जागवणं हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे असायचे. मानवी मनाची खरी जागृती ही त्याच्या आत्मोन्नतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन’ हे लक्षात घेऊन जागृत मनाने आपण आपली नित्य कर्मे ही त्या ईश्वराच्या साक्षीने करून ती त्यालाच समर्पित करणे हीच आहे खरं जागरण आणि तेच आहे मानवी जीवनातली खरी पहाट फुटणं.