काँग्रेसची उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बम यांना मोठा झटका; अटक वॉरंट जारी

भोपाळ – मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला होता. पक्षाने इंदोर येथून उमेदवारी दिलेल्या अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला तोंडघशी पाडले होते. त्यांनी त्यानंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र आता त्याच बम यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यासह चार जणांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले असून बम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात बम आणि अन्य आरोपींच्या विरोधात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. विशेष म्हणजे बम यांना जेंव्हा कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती त्यावेळीच त्यांच्या विरोधात संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला होता. हे प्रकरण १७ वर्षे जुने आहे. जमीन हडपण्यासाठी हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.
दरम्यान, बम यांनी माघार घेणे ही एक राजकीय चाल होती. मात्र त्यावेळी बम यांनी असा आरोप केला होता की त्यांना पक्ष संघटनेकडून कोणीतही मदत मिळत नसून निवडणुकीच्या प्रचारात ते एकाकी पडले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडूनही आपल्याला कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.




