प्रभात वृत्तसेवा पुणे – एनडीए दीक्षांत संचलनावेळी पत्रकार व छायाचित्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा निषेध नोंदवत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघानेही निषेध केला असून, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार आणि छायाचित्रकारांना बसण्याच्या व्यवस्थेत शेवटच्या क्षणी बदल झाला. नव्या जागेहून कार्यक्रमाचे वार्तांकन शक्य नसल्याचे पत्रकारांनी नमूद करत जुन्या जागेची विचारणा केली असता एऩडीएच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी उद्धट वर्तन केले. आम्ही दिलेल्या ठिकाणी तुम्हाला बसावे लागेल. मान्य असेल तर बसा; अन्यथा तुम्ही निघून जाण्यास मोकळे आहात, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. या वर्तणुकीची तक्रार केल्यानंतरही एनडीएतील कोणत्याही अधिकाऱ्याने मध्यस्थी किंवा पत्रकारांशी बोलण्यास पुढाकार घेतला नाही. श्रमिक पत्रकार संघाने या वागणुकीविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, पुणे जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, तसेच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.