‘एनडीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही’ – ममता बॅनर्जी

PM Narendra Modi Oath Ceremony | भाजप नेते, निवडून आलेले NDA संसदीय पक्षाचे नेते सोबत नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. एनडीएच्या सर्व नेत्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या समर्थनाची पत्रे दिली आहे. एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या नावालाही मान्यता दिली आहे.
तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन्ही पक्षांनी आघाडीचा नेता म्हणून मोदींना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी 7:15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांसह 8,000 हून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ आणि मॉरिशसमधील बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शनिवारी दिल्लीत पोहोचल्या. पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपरसह सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या शपथ विधीवरून पुन्हा एकदा विरोधकांनी बनणाऱ्या सरकारवर टीका केली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एनडीए सरकार टिकणार नसल्याचा दावा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बंद दरवाजाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेते आणि खासदारांना सांगितले की, “एनडीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही.’ असा दावा त्यांनी केला आहे.
बैठकीला उपस्थित असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “बैठकीदरम्यान ममता दीदी (ममता बॅनर्जी) यांनी आम्हाला सांगितले की, त्यांना खात्री आहे की एनडीए सरकार जास्त काळ टिकणार नाही कारण भाजपला बहुमत मिळणार नाही.”
भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते नाखुष आणि अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपचे नेतेच पक्ष सोडतील. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे ममता म्हणाल्या.





