शिर्डी – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये जास्तीत -जास्त जागा मिळण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून निवडणुकीची रणनीती ठरवली आहे. जागा वाटपाबाबत लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला.सध्या निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागल्याने शिर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठकीचे आयोजन करून निवडणुकीची रूपरेषा ठरवली. या बैठकीत झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चर्चामध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्तीत-जास्त जागा मिळण्याकरिता सोमवारी शिर्डीत हॉटेल पॅराडाईजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ४ पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली.समिती अध्यक्षपदी बाबासाहेब कोते तर सदस्य म्हणून रमेश गोंदकर, प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते व राष्ट्रवादी राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांनी या समितीत असलेल्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. जागा वाटपाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याची बैठकीत चर्चा झाली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर,माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, अमित शेळके, डॉ.सचिन गोंदकर, सुशांत औताडे, साई कोतकर,अमोल सुपेकर, राहुल फुंदे ,गणेश कानडे, गंगाधर वाघ आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.