साताऱ्यात आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा

उदयनराजे, रामराजे यांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष
सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा बुधवारी दि.28 रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यात्रेदरम्यान बुधवारी दहिवडी आणि साताऱ्यात जाहीर सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात पडझड सुरू आहे. अनेक भागातील प्रमुख नेते पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातही पक्षाच्या वर्चस्वाला उतरती कळा लागण्यास सुरवात झाली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदारकीचा राजीनाम देऊ पक्षातून भाजपमध्ये गेले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेकडे झुकल्याची चर्चा जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षांतराची चर्चा असलेले उदयनराजे आणि रामराजे यात्रेत सहभागी होऊन सभांना उपस्थित राहणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बुधवार दि.28 रोजी माळशिरस (जि.सोलापूर) येथून निघून दुपारी दोन वाजता यात्रेचे आगमन दहिवडी येथे होणार आहे. त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. यावेळी साहजिकच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणामध्ये भाजप, शिवसेनेसह आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका होऊ शकते.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता साताऱ्यातील कल्याण रिसॉर्ट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साहजिकच भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टीका होऊ शकते. त्याचबरोबर सध्या उदयनराजे व रामराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यावर दोन्ही नेत्यांनी ठोस प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही नेते पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहणार का, या प्रश्नाच्या उत्तरावर येत्या काळात दोन्ही नेत्यांची राजकीय वाटचाल असणार आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील जनतेसह सर्वच पक्षांचे शिवस्वराज्य यात्रेकडे लक्ष लागून राहिले आहे.





