कोयनानगर – पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी राष्ट्रवादी या बालेकिल्ल्यात बॅकफुटवर आहे, ही खरोखरच चिंतेची बाब असल्याची प्रांजळ कबुली विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी भक्कम करणाऱ्यांवर आपला भर असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी बॅकफुटवर आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आत्मचिंतन तर काही ठिकाणी खडे बोल देऊन राष्ट्रवादी भक्कम करु, असे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे, पण ती जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे नाही, अशा ठिकाणी जागेची अदलाबदल करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पाटण विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवणार नसून जागेची अदलाबदल करून सेनेकडून ही जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे संकेत दिले.
पाटण तालुक्यातील गुढे येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी कोयना विभागातील गोषटवाडी येथील माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या फॉरेस्ट एस्केप येथे त्यांनी शनिवारी मुक्काम केला. तरी कोयना व अजित पवार यांचे प्रेम सर्वश्रुत असल्याने त्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता कोयनानगर येथील कोयना प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृहात येऊन कार्यकर्त्याबरोबर चर्चा करून त्यांची निवेदने स्वीकारली.
अजित पवार म्हणाले की, ”पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार आहे. कुणी काहीही म्हटले तरी पुण्यामध्ये कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. आम्ही या गोष्टी मुद्देसूदपणे पटवून देऊ. तिन्ही पक्ष हा प्रश्न समन्वयाने सोडवतील.”
महाविकास आघाडीने कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पावले टाकली होती. सरकार गेल्यामुळे त्याला खिळ बसली. सत्ताधारी शिंदे गटातील काही मंत्री, काही लोकप्रतिनिधी विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या गप्पा मारत आहेत. आपण तसल्या भानगडीत पडत नाही. सत्ताधारी गटाच्या लोकांनी असल्या बाष्कळ बडबडी करण्यापेक्षा विकासकामे केली तर अतिउत्तम होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोयना विभागातील हेळवाक येथील शेतीचे रानगव्याने नुकसान केले. या शेतीची पाहणी अजित पवार यांनी करून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना फोन करून त्या बाधीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, मनीष चौधरी, सत्यजीत शेलार आदी उपस्थित होते.
कोयना विभागातील हुंबरळी हे गाव भुसल्खनामध्ये बाधीत झालेले आहे. या गावात बरेच नुकसान झाले आहे. शासनाने केलेल्या सर्वेक्षणात हुंबरळी गावाला पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे या गावाचे फेरसर्वेक्षण करावे व पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केल्यानंतर अजितदादा यांनी मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना फोनद्वारे ही बाब सांगून हा प्रश्न तात्काळ सोडवावा,असे स्पष्ट केले.