बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत

डोर्लेवाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2023 या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. यंदाच्या बारामती बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडून युवा पिढीला जास्त प्रमाणात संधी दिली आहे. यात राष्ट्रवादीने डोर्लेवाडी गणात तीन जणांना उमेदवारी देऊन विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले झारगडवाडीचे दयाराम महाडिक यांना ज्येष्ठ म्हणून संधी दिली गेली आहे.
ढेकळवाडीतून माझी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शुभम ठोंबरे आणि मेखळी गावातून माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्रिंबक सोसायटीचे चेअरमन आणि धर्मवीर पाणी वापर संस्थेचे चेअरमन युवराज देवकाते या दोन युवकांना राष्ट्रवादीने पुरस्कृत रयत पॅनल मधून संधी दिली आहे. तर भाजप रासप आणि शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल मधून निरावागज गावातून रासपचे विठ्ठल आबा देवकाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील येणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा सारासार विचार केला आहे. डोर्लेवाडी पंचायत समिती गणात तीन जणांना बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची उमेदवारी दिली असल्याचे दिसून येते. या गणात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झालेले दिसून आले आहे. यामुळेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या गणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.
यावर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व बारामती भाजप तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हुकूमशाही मोडीत काढत लोकशाही जिवंत ठेवणे, बारामती बाजार समितीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळवून देण्यासाठी, आणि व्यापा-यामध्ये प्रचंड असलेला असंतोष दूर करण्यासाठी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच होणार आहे. आतापर्यंत झालेल्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांसाठी ठोस कुठलीच भूमिका घेत उपयोजना केल्या नाहीत. भाजप शिवसेना सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा मान मिळवून दिला. येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून अनेक उपाय योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे,” असे पांडुरंग कचरे यांनी सांगितले आहे.
तर बाजार समितीमध्ये साहेब, दादा, ताई यांच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या योजना बारामती मार्केटमध्ये आणण्यात आल्या आहेत. या बारामती बाजार समितीचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार केला गेला आहे याचबरोबर स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील वाढवण्यात आली आहे. तालुक्यातील गाव विकासासाठी करोडो रुपयांचा निधी आणून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच विकास सोसायटीच्या सभासदांची आर्थिक गरज भागवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला आहे. या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबिण्यात आले आहेत या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनल हे 2023 चे पंचवार्षिक निवडणूक लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले आहे.





