धाराशिव : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांच्या मालकीच्या धाराशिव कारखान्याला चेअरमन असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने आपल्या अन्य साथीदारांच्या सहाय्याने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून सहा आरोपींना अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात अधिकारी असलेल्या बाबासाहेब वाडेकर यांच्याशी एका सायबर भामट्याने संपर्क केला होता. १५ ते १७ एप्रिल या कालावधीत आपण कारखान्याचे चेअरमन अमर पाटील बोलत असल्याचं भासवून त्याने संवाद केला. यानंतर इमर्जन्सी असल्याचे सांगत एका बँक खात्यात १ कोटी १० लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. तीन दिवसांतील संवादानंतर विश्वास वाटल्याने वाडेकर यांनी ही रक्कम वर्ग केली. मात्र या नंतर संशय वाटल्याने चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर वाडेकर यांनी तातडीने या प्रकाराबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये पंढरपूर येथील तीन, हरियाणा, आटपाडी आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका आरोपीला पकडण्यात आले. यातील तिघांना पुण्यातील लॉजवरून ताब्यात घेण्यात आले.या फसवणुकीच्या गुन्ह्यात आमदार अभिजित पाटील यांच्या पंढरपुरातील आरोपीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.