प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार पाहण्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केल्या आहेत.इंदापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद गेल्या महिन्यापासून रिक्त होते. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांसाठी संभाजी होळकर यांची नियुक्ती केली आहे. मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या चार तालुक्यांची जबाबदारी विठ्ठल शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी राजेंद्र कोरेकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या संदर्भात अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र तिघांना दिले आहे. पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नसल्याने, या तिघांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, तेथे निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना कोणतीही अडचण दिसत नाही.