राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना करोनाची लागण

परभणी – राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत.
मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणे दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
“मी अथवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कुठेही बाहेर गेलो नाही, तरीही हा संसर्ग झाला. बहुतेक बाहेरून घरी येणारा भाजीपाला अथवा इतर वस्तूंच्या माध्यमातून हा संसर्ग झाला असावा असा माझा अंदाज आहे. शिवाय माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार आहे.’ असे खान यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून फोजिया खान यांना जाहीर झालेल्या राज्यसभेवर नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचा शपथविधी हा उद्या दिल्लीत होणार आहे. परंतु करोना झाल्याने आपण या शपथविधीला जाणार नसून पुढील अधिवेशनात शपथ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.





