NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादीच्या आमदारांचा आज निकाल; कोण ठरणार अपात्र?

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. आज 15 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर राहुल नार्वेकर आजच निकाल देणार आहेत. यापूर्वी शिवसेना आमदार अपात्र निकालाबाबत देण्यात आलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असणार हे पाहावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडे अपात्रतेचे दावे दाखल केले आहेत. यावर अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर आज अखेर निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. न्यायालयानं यापूर्वी राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते.
आमदारांच्या अपात्रतेबाबत उशीर होत असल्याने शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. पण अद्याप साक्षी नोंदवण्याचे काम बाकी असल्याने नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार, कोर्टानं त्यांची विनंती मान्य केली होती. त्यामुळे 15 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार हे निश्चित झाले होते.
निवडणूक आयोगाचा निकाल
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल 10 हून अधिक सुनावणी घेतल्या होत्या. त्यानंतर अखेर सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने याबाबत निकाल दिला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाले. त्यामुले अजित पवार यांच्याकडंच राष्ट्रवादीची मालकी राहणार असल्याचं स्पष्ट झाले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे तपासून हा निर्णय दिले.
संघटनात्मक बहुमत असल्याच्या शरद पवार गटाच्या दाव्यात गंभीर विसंगती आढळल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या पक्षाला “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” असं नाव देण्यात आलं आहे.अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला.





