जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला; संभाजीराजेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्यकर्ते झाले आक्रमक

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजेंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या गाडीवर काही तरुणांकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषद आटोपून जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. हल्लोखोर कोण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.
आव्हाडांनी काय विधान केलं होतं?
संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. “संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
आव्हाडांच्या घराची सुरक्षा वाढली
आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज समर्थक आक्रमक झाले आहेत. आव्हाडांच्या घरी धडक देण्याचा इशारा समर्थक कार्यकर्त्यांनी दिला होता. यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांच्या घराबाहेरच्या बंदोबस्तात वाढ केली असून साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.





