राष्ट्रवादी कुण्या एकाचा नसून जनतेचा पक्ष – शरद पवार

मोदींनी माझ्या कुटुंबाबाबत चिंता करू नये
कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाबाबत चिंता करू नये, माझ्यावर माझ्या आईचे संस्कार झालेत आणि माझी आई कोल्हापूरची होती असा घणाघाती टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. मोदींनी वर्धा मध्ये भाषण करताना पवार कुटुंबीयांवर टीका केली होती त्याला उत्तर देत अजित पवार उत्तम काम करतात ते उत्तम प्रशासक आहेत असं सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुण्या एकाचा नसून जनतेचा पक्ष आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यतल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी- स्वाभिमानी शेतकरी संघटना या महाआघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांशी भेट घेतली. कोल्हापूरचे राष्ट्रवादी चे उमेदवार धनंजय महाडिक आणि हातकणंगले चे स्वाभिमानी चे उमेदवार राजू शेट्टी प्रचारार्थ कोल्हापुरात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ ,आमदार संध्यादेवी कुपेकर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे सह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षामध्ये 15 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाची किंमत शेतकऱ्यांना दिली जात नाही. राफेलमध्ये कोणी खाल्ले हे लवकरच देशाला समजेल.घटनेने दिलेले अधिकार सरकारकडून उध्वस्त होण्याची भीती आहे. पवार यांनी राज्य सरकावर टीकास्त्र सोडताना धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नसल्याचे म्हणाले. माझ्यावर कोल्हापुरी संस्कार झालेत त्यामुळे मोदींनी चिंता करू नये, असेही ते म्हणाले. देशात गांधी घराण्याचे मोठे योगदान आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत मोदी कुठे गेले तर गांधी परिवारावर टीका करतात मात्र इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही तर भूगोल घडवला असेही शरद पवार यांनी म्हटलंय तसंच सोनिया गांधी यांची स्तुती करत राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही सोनियांनी देश सोडला नाही त्यांनी देशाची बांधीलकी जपली असे म्हणाले.

दुसरीकडे या वेळी शिवारात कमळ दिसता कामा नये चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात चर्चेला यावंच असे आव्हान देत आमच्या नादाला लागू नका असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला तसंच लोक तुम्हाला उघडे पाडतील असेही त्यांनी म्हटलंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.