NCP Internal Rift – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग ११ मध्ये समाविष्ट असलेल्या एका उद्यानात सुरू असलेल्या धार्मिक बांधकामावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांना धारेवर धरले. एका कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार लांडगे यांना भररस्त्यात अडवून कदम यांनी चिंचवड येथील लोकांसमोरच थेट जाब विचारला. त्यामुळे आमदार लांडगे यांना रस्त्यामध्येच तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. तर बोलत असताना कदम यांनी विलास लांडे यांना पाडण्यासाठी पंधरा वर्ष तुमचे काम केल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादीतील दुफळी थेट जनतेसमोर आली. आमदार महेश लांडगे यांना जाब विचारताना माजी महापौर मंगला कदम या अतिशय संतप्त झाल्या होत्या. प्रामाणिकपणे गेली १५ वर्षे तुमचे काम करत आहोत. येथील सर्व नागरिक तुम्हालाच मतदान करतात. तुम्हाला पूर्वकल्पना देऊन आणि विचारूनच हे काम सुरू करण्यात आले आहे. तुम्ही मला तसे पत्रही दिले होते. आता मात्र तुमची नगरसेविका सांगतेय की, महेशदादांनीच मला हे काम पाडायला सांगितले आहे. तुमच्या नावाचा वापर करून तिने प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. मी तुम्हाला आधीच विचारले होते. आता मी हे काम पुढे करू की नको? मी विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी १५ वर्षे तुमच्या पाठीशी उभी राहिले. मंगला कदम यांचे हे उद्गार ऐकताच महेश लांडगे हे सुद्धा स्तब्ध झाले. उपस्थित लोकांचे मोबाइल कॅमेरे चालू असल्याचे लक्षात येताच लांडगे यांनी ते बंद करायला लावले. विलासभाऊ लांडे. या नाट्यमय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा वर्षांपासून सुरू असलेली अंतर्गत धूसफूस समोर आली. सन २०१४ साली महेश लांडगे आमदार विलास लांडे यांच्या विरोधात अपक्ष उभे राहिले होते. अपक्ष उभे असतानाही त्यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सन २०१९ साली देखील ते मोठ्या मताधिक्याने विलास लांडे यांच्या विरोधात निवडून आले. सन २०२४ च्या निवडणुकीत विलास लांडे उभे राहिले नाही, मात्र, त्यांचे निकटवर्तीय असलेले अजित गव्हाणे उभे राहिले. त्यांचाही महेश लांडगे यांनी पराभव केला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच भाजप आणि महेश लांडगे यांना रसद पुरवली जात असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, मंगला कदम यांच्या या गोंधळानंतर तब्बल १५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली खदखद आणि टोकाचे राजकारण बाहेर आले आहे. दादा म्हणतच होते… महापालिका निवडणुकीवेळी भाजपच्या भ्रष्टाचारावर स्वतः अजितदादांनी रान उठवले असतानाही पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प होते. त्यावेळीही पक्षातील पदाधिकाऱ्यांची भाजपला असलेली छुपी साथ समोर येत होतीच. यावर बोलताना अजितदादा अनेकवेळा म्हणाले होते की, माझचं मीठ अळणी आहे. त्याला काय करणारं? हे आता खरे असल्याचा प्रत्यय येत आहे. म्हणूनच दादा मुख्यमंत्री झाले नाही. आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर मंगला कदम यांच्यामध्ये झालेल्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीच भाजपला मदत करत असल्याने दादा मुख्यमंत्री होऊ शकले नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.