सातगावच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध

विष्णू हिंगे : दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांशी साधला संवाद
पेठ – सातगाव पठार भागातील गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आणखी विकासकामे करण्यासाठी वळसे पाटील यांना पुन्हा नेतृत्वाची संधी द्या, असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी केले.
सातगाव पठार भागातील पेठ येथे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ विष्णू हिंगे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, गणपतराव इंदोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, संतोष धुमाळ यांनी आठवडे बाजारात ग्राहक, विक्रेते, मतदारांशी संवाद साधला, त्यावेळी हिंगे बोलत होते. यावेळी शरद सहकारी बॅंकेचे संचालक जगदिश धुमाळ, बाळासाहेब पवळे, नाथा पाटील घेवडे, राजेंद्र तेली, विलास काळे, शिवाजीराव घेवडे, अभिजीत काळे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
आठवडे बाजारात सर्व ग्राहक मतदारांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार वळसे पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. या भागातील प्रलंबित कामांची माहिती पदाधिकाऱ्यांनी घेवून अडचणी सोडवल्या जातील, अशी ग्वाही देऊन पदाधिकाऱ्यांनी आमदार वळसे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सातगाव पठार भागातून वळसे पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे.राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते गावोगावी, वाडी, वस्त्या, मळ्यांमध्ये जाऊन मतदारांशी गाठीभेट घेत आहेत. मतदारांची वळसे पाटील यांनाच पसंती आहे.
– जगदीश धुमाळ, संचालक, शरद बॅंक





