जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका….

Dhananjay Munde | बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आले आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो देखील समोर आले. त्यानंतर आता मुंडेंकडून मंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांची देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती समोर आली होती. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका….
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रक जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे.
‘धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याच्या निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे.’
‘हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.’
‘धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती.’
‘या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’, असे म्हणत राष्ट्रवादीने राजीनाम्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.’
‘ न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.’, असे ट्विट करत मुंडेंनी राजीनाम्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.




