आमदार लंकेंचं पत्र्याचं घर, लाकडी कपाटाला टेकवून प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले शरद पवार

अहमदनगर – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी पवार यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली.
साधारणत: एखाद्या आमदाराचे घर म्हंटले की, मोठा बंगला, बंगल्यासमोर अलिशान गाड्या, नोकरचाकर, मोठी जागा, असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, आमदार निलेश लंके यांचे घर एकदम साधारण आहे. पत्र्याचं घर, एक रूम, छोटं किचन आणि बाजूला बाथरूम अशी आमदार लंकेंच्या घराची रचना आहे. या छोट्या घराला आज शरद पवार यांनी भेट दिल्याने लंके कुटुंबीय भारावून गेले.
शरद पवार आमदार लंकेंच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांना बसण्यासाठी प्लास्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकवून ही खुर्ची ठेवण्यात आली. पवार यांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या त्यावर लंके यांचे आई-वडिल बसले होते. यावेळी शरद पवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांनीही लंके यांच्या घरी भेट दिली.
आमदार लंके यांचं 9 जणांचे कुटुंब
आमदार लंके यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्या परिवारात आईवडिल, भाऊ-भावजय, पुतण्या-पुतणी, दोन मुले आणि पत्नी असे नऊ जणांचे कुटुंब आहे. लंके यांचे वडिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त आहेत. आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. दरम्यान, कोविड काळात आमदार लंके यांनी 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर उभारलं. तेव्हापासून ते चर्चेत आले.
“आमचा मुलगा हा आमदार होईल हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पहिल्यापासून त्याने कधी घराकडे लक्ष दिले नाही. कोणी आजारी पडले, कुठे काही समस्या निर्माण झाली तर धावून जाणे एवढंच त्याचं काम होतं. आमच्याकडे काहीच नव्हतं पण आज मुलगा आमदार झाल्याचं पाहून अभिमान वाटतो,” अशा भावना आमदार लंके यांची आई शकुंतला यांनी व्यक्त केली.





