पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण? हा प्रश्न दोन मतदारसंघात संपुष्टात आला असून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सुलक्षणा शिलवंत-धर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून चिंचवड विधानसभेतून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरी मतदारसंघातील खलबते अद्याप सुरूच असून या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीला अद्यापही जाहीर करता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीने आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये पिंपरी राखीव मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरक्षणा शिलवंत यांचे नाव जाहीर करण्यात आले. चिंचवडमधून प्रशांत शितोळे हे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या वर्तुळातून शितोळे हे पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी पत्रकारांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. भोसरीचे मात्र अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरूच भोसरीचे गुऱ्हाळ आजही सुरू होते. भोसरीतून माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवावी, असा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे तर लांडे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. विरोधकांमधील दुहीचा फायदा घेऊन विजय मिळविणे, दोनवेळा भोसरीकरांनी अपक्षाला दिलेली संधी या बाबी फायदेशीर ठरू शकतील, असा त्यांचा दावा आहे.