पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष ताकदीने आपला प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवारांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी अजित पवार यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. “अजित दादांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेत भरीव कामगिरी होईल. त्यामुळे येणारा काळ हा पुणे महानगरपालिकेसाठी सुवर्णकाळ असेल”, असं राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार गौरव घुले यावेळी म्हणाले. “आजचा पूर्ण दिवस अजितदादांनी प्रभाग क्रमांक २० साठी दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, १६ तारखेला पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. अजित पवारांच्या या रॅलीमध्ये अप्पा अमराळे, गणेशशेठ घुले, सुनील अप्पा बिबवे, डॉ. सुनिता मोरे, निता कुलकर्णी, रमेश बाणकर या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशशेठ घुले मित्र परिवार, अखिल बिबवेवाडी गावठाण, महेश सोसायटी मित्र मंडळ, इंदिरानगर मित्र मंडळ शनि मारुती मंदिर या सर्वांच्या वतीने या रॅलीचे स्वागत करण्यात आले. परिसरातील रहिवासी देखील मोठ्या प्रमाणात या रॅलीसाठी जमा झाले होते. एकंदरीत, अजित पवारांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादीचे भव्य असे शक्तिप्रदर्शन प्रभाग क्रमांक २०मध्ये पहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले, प्रितम रमेश नागापुरे, अस्मिता विशाल शिंदे आणि रश्मी विक्रांत अमराळे यांच्या पॅनलचा गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू आहे. परिसरातील विविध भागांना तसेच कित्येक सोसायटींना भेट देऊन त्यांनी नागरिकांसोबत चर्चा केली, आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या जनसंपर्क यात्रेला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.