Suresh Dhas : राष्ट्रवादीची रणनीती ठरली ! सुरेश धस यांची ‘ती’ प्रकरणे बाहेर काढणार

बीड : देशमुख हत्या प्रकरणात नवनवे आरोप आणि गौप्यस्फोट करून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार सुरेश धस करत आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी आता राष्ट्रवादीकडूनदेखील रणनीती आखण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजावून सांगूनही सुरेश धस मानायला तयार नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांची कोंडी केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हंटले.
खुनाच्या आधी दोन दिवसांपूर्वी सुरेश धस यांचा वाल्मिक कराड यांना फोन
देशमुख यांची हत्या होण्याच्या दोन दिवसांआधी वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचा फोन झालेला आहे. तो फोन कोणत्या कारणांसाठी झाला, याची चौकशी सुरेश धस यांचा सीडीआर काढून झाली पाहिजे. जर दोघेही थेट संपर्कात असतील तर धस यांचीही वैयक्तिक चौकशी सरकारने केली पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.
धस यांच्या कथित प्रकरणांची मिटकरी यांनी यादीच वाचली
पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावामध्ये दारासिंग भोसले गँगने टाकलेला दरोडा, राम खाडे खून, सतीश शिंदे यांची हत्या, आष्टी पाटोदा तालुक्यातील वाळू प्रकरण, बोगस मनरेगाची प्रकरणे, हफ्तेवसुली, आष्टीमधील ८५ बार आणि धाब्यावर बनावट दारू विक्री, विक्रम धस हत्या प्रकरण, मनी लॉन्ड्रिंग्ज अशी मोठी यादी आहे असे अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.





