NCB Big Action: एनसीबी (Narcotics Control Bureau) ने महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात मोठी कारवाई करत किराणा माल वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून तब्बल ७०२ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून जप्त अंमली पदार्थाची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. गुप्त माहितीनुसार एनसीबीने प्रकाश एम. डी. आणि पदमलाल एन. एम. या दोघांना ट्रकसह अडवून तपासणी केली. ट्रकमध्ये डिटर्जंट, टूथपेस्ट, हेअर डाई आदी किराणा व दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये लपवून ठेवलेली गांजाची १०० पाकिटे आढळून आली. हेही वाचा – राज्यातील पेट्रोल-डिझेलबाबत छगन भुजबळ यांची महत्वाची माहिती; म्हणाले – ‘नागरिकांनी…’ प्राथमिक तपासात हा गांजा ओडिशा राज्यातून आणण्यात आल्याचे समोर आले असून तो नागपूर, गोंदिया, पुणे आणि मुंबई येथील अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांना पुरविण्यात येणार होता. आरोपी नियमितपणे ओडिशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही एनसीबीने ओडिशातून आणण्यात आलेला २१० किलो गांजा जप्त करून चार जणांना अटक केली होती. दरम्यान, अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती नागरिकांनी ‘मानस’ राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाइन क्रमांक १९३३ वर द्यावी, असे आवाहन एनसीबीने केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही एजन्सीने स्पष्ट केले.