रिटेल, वाहन कर्जपुरवठ्यावर परिणाम
पुणे – आयएल ऍन्ड एफएस प्रकरणामुळे 2019 मध्ये एनबीएफसींची म्हणजे बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांची अनुत्पादक मालमत्ता वाढून 6.1 टक्क्यांवर गेली आहे. 2018 मध्ये एनबीएफसींची अनुत्पादक मालमत्ता केवळ 5.3 टक्के होती.
रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार, एनबीएफसींची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 3.3 टक्क्यावरून 3.4 टक्के इतकी झाली आहे. आयएल ऍन्ड एफएस या मोठ्या एनबीएफसी कंपनीला आपली बरीच कर्जे परत करता आली नाहीत. त्याचा संसर्ग इतर एनबीएफसी कंपन्यांवर झाल्यामुळे ही अनुत्पादक मालमत्ता वाढली.
एवढेच नाही तर या कंपन्यांकडून रिटेल, वाहन आणि घरासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जातही घट झाल्यामुळे कर्जाच्या उठावावर परिणाम झाला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बळकट एनबीएफसींना इतर बॅंकांनी मदत करावी, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने केलेली आहे.
मार्चपासून बरेच प्रयत्न करूनही एनबीएफसींची अनुत्पादक मालमत्ता सप्टेंबरपर्यंत काही प्रमाणात वाढली, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले असले तरी याची आकडेवारी मात्र जाहीर केली नाही. एनबीएफसी अनौपचारिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करतात. नोटाबंदीनंतर अनौपचारिक क्षेत्रामध्ये मंदी आली आहे.