पुणे जिल्हा | नाझरे जलाशय 80 टक्के भरले

जवळार्जुन, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण चांगले असल्याने कर्हा नदीच्या पाण्याने नाझरे धरणात पाण्याचा 80 टक्के पाणीसाठा झाला आहे; परंतु धरणापासून खाली बारामती तालुक्यात जाणार्या कर्हा नदीला अद्यापही पाणी नसल्याने अजूनही कोरडी पडलेली आहे. तर पुरंदर पूर्व भागावरही वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण तालुका तसेच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बळीराजा वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे. नाझरे धरणाची (मल्हार सागर जलाशय) 788 दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे.
त्यापैकी 200 दशलक्ष घनफूट मृतसाठा असून तसेच सध्या नाझरे धरणातील पिण्यासाठी अवघे 670 दशलक्ष घनफूट गाळमिश्रित पाणीसाठा वापरासाठी उपलब्ध झाला आहे.
नाझरे धरणावर अवलंबून असलेल्या 6 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्यात मोरगाव नळ प्रादेशिक योजना व 16 गावे, नाझरे प्रादेशिक योजना व इतर 5 गावे, पारगाव माळशिरस व इतर 23 गावे, जेजुरी नगरपालिका पाणीपुरवठा योजना,
इंडियन सिमलेस कंपनी, जेजुरी एमआयडीसी,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जेजुरी आदींसाठी नाझरे धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणात 80 टक्के साठा झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसा सुटला असल्याची चर्चा होत आहे.
धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो, सुमारे 3150 हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. नाझरे धरणात पाणीसाठा वाढल्याने व लाभ क्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणाच्या परिसरात 1 पासून 391 नोंद झाली आहे, मागील दोन वर्षांपूर्वी हाच पाऊस 900 मिलिमीटर होता.
त्यामुळे पावसाचे प्रमाण तसे कमीच असल्याने यंदाही खरीप हंगाम हताचा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा संपला तरी ओढ्या नाल्यांना पाणी नाही. तर भविष्यात शेतीच्याच्या पाण्यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यात पुरंदरच्या पश्चिमेकडील भागात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सरासरी 3 ते 5 टक्के वाढ होत आहे. – विश्वास पवार, अधिकारी, नाझरे धरण
पुरंदरच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे. धरण 80 टक्के भरले असल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. – अनिल घोडके, शाखा अभियंता, नाझरे धरण

