Nazer Kazi । पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय बेरीज वजाबाकी लक्षात घेऊन या विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार ठरवण्याकडे सर्व पक्षांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते. मुस्लीम व्होटबँक एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला होता. याच गोष्टीचा विचार करून करून अजित गटाकडून आपल्या रणनीतीमध्ये महत्वाचा बदल केला असल्याचे दिसत आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलावले असल्याचे खुद्द काझी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नाझेर काझी अजित पवारांच्या मर्जीतील नेते Nazer Kazi । दरम्यान, नाझेर काझी हे अजित पवार यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काझी ज्या मतदारसंघात राहतात, त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून डॉ.राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक Nazer Kazi । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या नेतृ्त्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा अल्पसंख्याक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना काही गोष्टी सुचवल्या होत्या. महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लीम समाजासंदर्भात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्यं केली जात असल्याबद्दल अल्पसंख्याक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी महायुती सरकारसमोर मांडावा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांनी सुचवले होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने विधानपरिषद निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.