मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचे निधन झाले आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या घटनेमुळे मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत’, असं नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच या दुखद घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या दुःखद घटनेमुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 18 सप्टेंबरला झाला होता अपघात – समीर खान 18 सप्टेंबरला पत्नी निलोफर यांच्यासोबत रुटीन चेकअपसाठी कुर्ल्यात क्रिटी केअर हॉस्पिटल येथे गेले होते. चेकअपनंतर त्यांनी आपल्या ड्रायव्हरला हॉस्पिटलबाहेर गाडी आणण्यास सांगितले. ड्रायवर थार गाडी घेऊन तिथे आला. पण त्याने समीर खान यांच्याजवळ आल्यावर ब्रेकवर पाय ठेवण्याच्या ऐवजी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. गाडीसमोर असलेले खान यांना जोराची धडक बसली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. समीर खान यांच्या पत्नी निलोफर यांच्यादेखील हाताला दुखापत झाली होती. पण त्या या अपघातातून सुखरुप बचावल्या. पण समीर खान यांना गंभीर दुखापत झाल्याने आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, या प्रकरणातील गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.