नवाब मलिकांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना 3 मार्चपर्यत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु मलिकांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना मुंबईतील जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मलिकांवर उपचार सुरू आहेत. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने मलिकांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज(शुक्रवार) सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे.जे. रूग्णालयात आणले होते. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना तासाभरात पुन्हा ईडीच्या कोठडीत नेणे अपेक्षित होतें. मात्र, चार तास झाल्यानंतरही त्यांच्यावर उर्वरित चाचण्या सुरू होत्या. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. त्यानुसार त्यांना उपचारासाठी जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष पीएमएलए कोर्टाने 3 मार्चपर्यत ईडीची कोठडी नवाब मलिकांना सुनावली होती. कुख्यात गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र, नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, हे उपचार किती दिवस सुरू राहणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांच्या अटकेचा परिणाम फक्त महाराष्ट्रात नाही तर सध्या निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही दिसून येत आहे. तसेच आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढला आहे.





