Satara: सातार्यात नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता
Satara रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांच्या देवींचे मनोहारी रूप पाहण्यासाठी नागरिक रस्त्यांवर थांबले होते. ठिकठिकाणी आरती, महापूजा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका पुढे सरकत होत्या. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार वगळता एकंदर मिरवणुका शांततेत पार पडल्या.

Satara: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचे भान राखत यंदा नवरात्रोत्सवाच्या जल्लोषाला साधेपणाची किनार लाभली. नऊ दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर सातारा शहरात बुधवारी दुर्गादेवींच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, आरतीचे सूर आणि पारंपरिक उत्साह अनुभवायला मिळाला. शहरातील 74 नवरात्रोत्सव मंडळांच्या देवींच्या मिरवणुका सायंकाळी पाच नंतर सुरू झाल्या. बुधवार नाक्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या या मिरवणुका तब्बल 14 तास रंगल्या.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये देवींच्या दर्शनासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. रस्त्यांवर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, ढोल-ताशांचा निनाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. सदर बाजारातील भारतमाता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा आणि मोती चौकातील देवीचा भेट सोहळा विशेष आकर्षण ठरतो राजपथावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही भेट टाळत गर्दी नियंत्रणासाठी नियोजन केले होते.
रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांच्या देवींचे मनोहारी रूप पाहण्यासाठी नागरिक रस्त्यांवर थांबले होते. ठिकठिकाणी आरती, महापूजा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका पुढे सरकत होत्या. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार वगळता एकंदर मिरवणुका शांततेत पार पडल्या.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशानुसार सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांचा सुमारे दीडशे अधिकारी-कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय स्ट्राइकिंग फोर्सही सज्ज ठेवण्यात आली होती.शाहू चौक ते देवी चौक ते मोती चौक तेथून प्रतापगंज पेठे मार्गे बुधवारनाका विसर्जन तळे अशा मिरवणुका काढण्यात आल्या. बुधवार नाका येथील विसर्जन तळ्यावर नगरपालिकेने 25 कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. टप्प्याटप्प्याने देवींचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, दसर्यानिमित्त शहरात पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. जलमंदिर येथे शमीपूजन आणि शस्त्रपूजन, तर विविध ठिकाणी आपट्याच्या पानांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे आदिशक्तीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली.
जलमंदिर येथील दसरा सोहळा साधेपणाने
दुष्काळी परिस्थितीचे भान राखून खा. उदयनराजे भोसले यांनी यंदाचा दसरा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जलमंदिर येथे भवानी मातेचे दर्शन, शस्त्रपूजन आणि शमीपूजन असे पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी सौ. दमयंतीराजे भोसले यांची यावेळी उपस्थिती होती. उपेंद्र धांदरफळे यांनी पौरोहित्य केले. लोकसभा संयोजक सुनील काटकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, अॅड. विनीत पाटील यांच्यासह खासदार गटाचे समर्थक उपस्थित होते. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलमंदिर आणि सुरुची येथे आपट्याची पाने वाटून दसरा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा कडक बंदोबस्त
सातारा शहरातील 74 नवरात्रोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. राजपथासह प्रमुख चौकांमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला. शहर आणि शाहूपुरी पोलिसांचे सुमारे दीडशे अधिकारी-कर्मचारी, तसेच स्ट्राइकिंग फोर्स तैनात करण्यात आली होती.





