नवनीत राणांनी दाऊदच्या साथीदाराकडून घेतले 80 लाख रूपये; राऊतांनी दिला प्रतिज्ञापत्राचाच दाखला

मुंबई – भाजपशी संलग्न असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी दाऊद इब्राहीमचा साथीदार युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रूपये घेतल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी स्वत:च निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली असून त्यात त्यांनी ही रक्कम कर्ज स्वरूपात घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्याची प्रतही आज राऊत यांनी सादर केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केलेले युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी जे 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्याची आता ईडीने चौकशी केली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आर्थर रोड तुरुंगात लकडावाला यांचा मृत्यू झाला आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की हा लकडावाला दाऊद गॅंगशी संबंधीत आहे. ही ईडीने चौकशी आणि कारवाई करण्यासाठीची योग्य केस आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. काल रात्री त्यांनी नवनीत राणा यांचे मालमत्ता विषयक प्रतिज्ञापत्र ट्विटरवरून जारी केले आणि त्यात त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि देवेंद्र फडणवीस यांनाहीं टॅग केले आहे.
आज बुधवारी राऊत यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, युसूफचा अवैध पैसा आता राणाच्या खात्यात आहे. ईडी त्यांना कधी चहा देणार? डी-गॅंग का वाचवली जात आहे? भाजप गप्प का आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.





